मी माझे मत विकणार नाही निबंध मराठी

Categorized as Blog

मी माझे मत विकणार नाही निबंध मराठी – नमस्कार मित्रांनो, जगात सर्वात मोठी असणारी लोकशाहीचा देश म्हणजे भारत, आणि आपण या भारताचे सुज्ञान नागरिक. जगात भलेही भारताची अर्थव्यवस्था उंचावत असेल, पण खरंच भारताची प्रगती होत आहे का? एकीकडे बलाढ्य, महासत्ता बनण्याच्या दिशेने जात असताना, देशात मात्र बेरोजगारी, भ्रष्टाचार अश्या अनेक गंभीर समस्या तोंड वर काढत आहेत.

या समस्या निर्माण करण्यात आपल्या सर्वाचा कुठेतरी हातभार आहेच की. आजही आपण आपले मूलभूत हक्क तर मागतो, पण आपले कर्तव्य पार पाडत नाही. हो, मी त्याच कर्तव्याची जाणीव करून देत आहे, मतदान… जो तुम्हाला एक चांगला नेता मिळवून देऊ शकतो.

पण हल्ली कितीही नाही म्हटलं तरीही, तुम्ही आम्ही असे बरेच मतदार विकले जाऊन, थोडक्या पैशात आपले मत कुण्या एका उमेदवाराला देतो. खर तर ही गोष्ट लोकशाहीसाठी खूप धोकादायक असते. त्यामुळे आपण जाणीवपूर्वक योग्य उमेदवाराला निवडून देणे आवश्यक आहे.

या लेखामधून मी तुमच्यासोबत मी माझे मत विकणार नाही निबंध मराठी या विषयावर बोलणार आहे. आशा करतो की, माझे विचार तुम्हाला नक्की पटतील, आणि तुम्ही, मी नव्या युगाचा मतदार बनू.

मी माझे मत विकणार नाही निबंध मराठी

लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.

भारतीय लोकशाही ही जगात सर्वांत मोठी लोकशाही आहे. त्यामुळे साहजिकच देशात अनेक प्रश्न निर्माण होतात. या समस्या व्यवस्थितपणे सोडवून, सर्व समाजाचा विकास व्हावा, या हेतूने संविधानानुसार दर पाच वर्षांनी निवडणुका घेऊन, गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर उमेदवार नियुक्त केले जातात.

मग हे जनतेतून निवडून आलेले उमेदवार सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार बनतात. आणि मग पुढील पाच वर्षांसाठी सगळा कारभार यांच्याच हाती राहतो. ही पाच वर्षे संपली की, पुन्हा आचारसंहिता, पुन्हा निवडणुका आणि पुन्हा तेच सारं…

इथपर्यंत तुमच्या लक्षात आले असेल, की कोणत्याही उमेदवाराची निवड करण्याची पूर्ण क्षमता ही एका मतावर अवलंबून असते. त्यामुळे साहजिकच तुम्ही चुकीच्या उमेदवारावर तर तुमचं मत देत नाही ना, याची खातरजमा करून घ्या.

आता चुकीचा उमेदवार म्हणजे कोण? तर असा उमेदवार जो तुमच्या शिक्षणाचा, रोजगाराचा, सुरक्षिततेचा, आणि सर्वागीण विकासासाठी प्रयत्नशील राहत नसेल.

लक्षात घ्या, मी येथे फक्त तुमच्या या शब्दावर अधोरेखित केले आहे, कारण तुमच्यापासून केलेली सुरुवात ती सर्वांगीण होते.

आता पाहा, थोड्याच दिवसात निवडणुकांची घोषणा होईल. आणि मग निवडणुकांची जोरदार तयारी सुरू होईल. ज्यात मग प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने पक्षाचा आणि स्वतःचा प्रचार करायला सुरुवात करेल.

निवडणूक प्रक्रियेत प्रचार खूप महत्वाचा घटक असतो. कारण प्रचार केला तरच त्यांना लोक पुन्हा निवडून देतील. निवडणुकीत अधिकची मत मिळविणाऱ्या उमेदवाराची निवड होत असते. त्यामुळे प्रत्येक उमेदवार साम-दाम-दंड-भेद अशा कोणत्याही मार्गाने मत मिळविण्याचा प्रयत्न करतो.

हे झालं उमेदवारच, पण मतदारांचा काय? तर मतदारही यात सहभागी होतात. मग काय, शक्य होईल तितक्या उमेदवारांकडून मतदार मत देण्याच्या बदल्यात पैसे, वस्तू घेतो. अगदी सगळेच नाही हो, पण हा बहुतेक मतदार पैसे घेतातच, ही सत्य परिस्थिती आहे.

तुमच्यापैकी बऱ्याच जण कार्यकर्ता ही पदवी घेत, कुण्या एका नेत्याला निवडून आणतो. मी आजपर्यंत बहुतांश असे कार्यकर्ते बेरोजगार पाहिले आहेत. आपण साहेबांसाठी काम केलं, की आपली कामे पटकन होतील, या आशेने ही कार्यकर्ते आपला अमूल्य वेळ विकतात.

निवडणुकीच्या दिवशी सर्व कामगार आणि शाळांना सुट्टी असते, हे तर तुम्हाला माहिती असेलच. या दिवशी सुट्टी आहे, म्हणून काही शिकलेली अन हुकलेली लोक चक्क फिरायला, पर्यटनाला जातात.

काहीही असले, तरी आपल्या भारताची हीच खरी आणि वास्तवदर्शी परिस्थिती आहे. बऱ्याचदा एखाद्या उमेदवाराची इच्छा नसताना देखील स्वतः मतदारांकडून पैशाची मागणी केली जाते. मतदारांना दुखवायचे नसेल, आणि निवडून यायचे लक्ष असल्याने उमेदवारांना मतदाराची ही मागणी नक्कीच मान्य करावी लागते.

पण गंमत अशी आहे, जो उमेदवार मतदारांना पैसे देऊ शकला नाही, त्याचा पराभव फिक्स असतो. मी असे नाही म्हणत, की 100% असाच होत. पण बऱ्याच प्रमाणात हे असच होत.

आता विचार करा, जर आपण कुण्या मतदाराला मत देण्याच्या बदल्यात पैसे किंवा इतर काही मागितले असेल आणि त्याने ते दिले सुद्घा, तर निवडून आल्यावर तुम्हाला त्याला तुमच्या कामाबद्दल जाब विचारण्यास संकोच वाटणार नाही का?

किंवा साहेबांकडून अगोदरच पैसे घेतल्यावर, साहेब का बरं आपले काम करतील? इतका साधा प्रश्न देखील एक मतदार म्हणून आपल्याला पडत नाही.

परिणामी होते काय? एखादा उमेदवार प्रचार करताना लाखो रुपये लोकांमध्ये वाटतो. ज्यामुळे त्याच्या पक्षाला आणि त्याला हा खर्च करावा लागतो. पुढे बहुमत प्राप्त करून हाच नेता आणि त्याचा पक्ष सत्तेत येतात.

बरं, आता खरी सुरुवात येथून होते. ज्या उमेदवाराला निवडून येण्याअगोदर लाखो रुपयांचा खर्च करावा लागला, तो खर्च भरपाई करण्याचा तो प्रयत्न करतोच. बर, हा निधी कुण्या एकट्याने दिलेला नसतो, यात त्याचा पक्ष, उद्योजक आणि इतरही बरेच मंडळी असतात.

जसं मी मागेच बोललो, साहेबांकडून अगोदरच पैसे घेतल्यावर, साहेब का बरं आपले काम करतील? तसच काहीस इथेही होते. ज्या उमेदवाराला ज्यांनी निधी दिला आहे, मग तो पक्ष असो अथवा कुणी उद्योजक, या सर्वांच्या विरोधात जाऊन त्या नेत्याला काम करता येत नाही.

मग यातूनच पुढे अनेक घोटाळे होतात. उदा. आपल्या गावाच्या रत्याच काम करायचं आहे. मग टेंडर प्रक्रिया, आणि त्याच्या निधीत बरोबर हिस्सेदारी होते. परिणामी आपल्या रस्त्याची कामे तर होतात, पण कमाई निधीत आणि कमी दर्जाची. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

शासकीय अधिकारी व कर्मचारी भरती, विविध प्रकारचे टेंडर आणि विकासकामे, घरकुल योजना, ग्रामविकास योजना, शेतीसाठीच्या योजना, शैक्षणिक संस्था, सहकारी पतसंस्था, कारखाने अश्या अनेक ठिकाणी झालेले घोटाळे आपण पाहतो.

थोडक्यात काय, तर गावातल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत याचा परिणाम दिसून येतो. यातून होते काय? तर समाजात वर्ग निर्माण होतात. यातील एक वर्ग गरीब तर एक श्रीमंत असतो. फार पूर्वीपासून श्रीमंत वर्ग हा दुसऱ्या वर्गातील लोकांचे शोषण करीत आलेला आहे.

यातूनच महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, असुरक्षितता, शेतकरी आत्महत्या, बिकट न्यायव्यवस्था, कंत्राटी कामगारांचे शोषण निर्माण होऊन सामाजिक दर्जा खालवतो.

या सर्व समस्यांपासून आपण बचाव करू शकतो, फक्त मी माझे मत विकणार नाही आणि जागरूकतेने मतदान करेल असे ठरवून. तर मग आपण निर्धार पक्का करूयात, मी माझे मत विकणार नाही आणि संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून आपण आपली आणि समाजाची प्रगती करूया.

सारांश

तर मित्रांनो, आशा करतो की मी माझे मत विकणार नाही निबंध मराठी तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला कोणत्याही विषयावर आत्मकथा, निबंध किंवा भाषण हवे असेल, तर आम्हाला कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर संबंधित विषयावर लेख प्रसिद्ध करू.