इयत्ता दहावी निरोप समारंभ भाषण

Categorized as Blog

10th Class Send Off Speech In Marathi – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी म्हणजे आपल्या शालेय जीवनातील शेवटचे वर्ष असते. दहावीनंतर प्रत्येक जण आपापल्या आयुष्याची वाट शोधण्यासाठी सज्ज होतो. खर तर ही आनंदाची बाब असते, पण पहिलीपासून ते दहावी पर्यंत आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या मित्रांसोबत राहिलो, आपले शिक्षक आणि शाळेला सोडून आपण पुढे जाणार असतो.

शाळेचा, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांचा निरोप घेताना नकळतच आपले मन भरून येत असते. बोलायचे खूप काही असते, पण शब्द सुचत नाहीत.

यासाठी आज मी तुमच्यासाठी दहावीच्या निरोप सभारंभात भाषण कसे करावे, यासाठी एक दहावी निरोप समारंभ नमुना भाषण (10th Class Send Off Speech In Marathi) देणार आहे. मला आशा आहे की, या भाषणाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.

इयत्ता दहावी निरोप समारंभ भाषण (10th Class Send Off Speech In Marathi)

मी सागर गायकवाड, आज या ठिकाणी निरोप समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी माझे मनोगत मांडण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे.

सर्वप्रथम या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरील प्रमुख पाहुणे, शाळेचे मुख्याध्यापक, मला अध्यापन करणारा शिक्षकवृंद, सुजान पालक आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार..

आज या व्यासपीठावर माझे मनोगत मांडत असताना, फलकावरती दिसत असलेले दोन शब्द निरोप समारंभ वाचताच मनाला एक वेगळीच हुरहुर लागली आहे.

आज माझा या शाळेतील शेवटचा दिवस, तर दुसऱ्या बाजूला मन म्हणत आहे आता खरी लढाई सुरू झाली आहे. जगाच्या स्पर्धेमध्ये तू आता उडी मारणार आहेस, म्हणून मनामध्ये एकच घालमेल चाललेली आहे ती म्हणजे…

आज तू निरोप घेतोय की,
येणाऱ्या नव्या आव्हानांना
तोंड देण्यासाठी सज्ज होतोय..

असो हा खूप पुढचा विचार आहे. परंतु सध्या तरी या ठिकाणी या शाळेने मला काय दिले? माझ्या शिक्षकांनी, माझ्या मित्र-मैत्रिणींनी दिलेले कटू गोड अनुभव मी या ठिकाणी शेअर करणार आहे.

Related – अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी भाषण मराठी

10वी निरोप समारंभ भाषण (Nirop Samarambh Bhashan In Marathi For Students)

आज निरोप समारंभाच्या दिनी
हृदयात दाटून आल्या जुन्या आठवणी
डोळ्यात नकळत आले पाणी 🥺
आज बोलताना अडखळतेय वाणी
या शाळेत आल्यानंतर गायली
आम्ही सुखदुःखाची गाणी
निरोपानंतर या सगळ्या
आठवणींची उद्या हो
बनेल एक कहानी..

निरोप समारंभाच्या दिनी अशी अवस्था केवळ माझीच नाही तर, इथे जमलेल्या माझ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणीची आहे…

माझ्या समोर उपस्थित असलेल्या मित्रांपैकी काहीजण इयत्ता पहिली पासून प्राथमिक शिक्षण पूर्ण करेपर्यंत माझ्या सोबत होते. तर काही नव्याने माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांच्याशी आमचा परिचय झाला. आता मात्र या पुढील कॉलेजचे शिक्षण आणि उपलब्ध असलेले पर्याय याचा विचार करता,आता प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या होतील.

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोण कला तर कोणी वाणिज्य शाखेला जाईल, तर कोणी विज्ञान शाखेला जाईल, काहीजण घरची आर्थिक परिस्थिती बेताची असेल म्हणून किंवा तात्काळ रोजगार मिळावा म्हणून एखादा आयटीआयचा कोर्स करतील. काहीजण इंजिनीयर बनन्याचे स्वप्न पाहत असतील तर ते डिप्लोमा साठी प्रवेश घेतील.

कदाचित काहीजण तर यापेक्षाही काही वेगळा मार्ग निवडतील. सांगण्याचे तात्पर्य हेच की आम्हाला आता यापुढे सोबत शिकता येणार नाही, ही एक खंत…

आमच्या गुरुजनांनी देखील आम्हाला या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना, शिस्तीपेक्षा स्वयंशिस्तीचे अधिक धडे दिले, जीवनामध्ये संस्कार किती गरजेचे आहेत ह्याचे महत्व पटवून दिले. साहजिकच त्यांनी आम्हाला दिलेले हे शिस्त, संस्कार आणि माणुसकी यांचे धडे आम्ही आमच्या जीवनामध्ये नक्कीच लागू करू.

कळत नकळतपणे मागच्या बाकावर बसून कधी कधी मी शिक्षकांना देखील त्रास दिला, ते अध्यापन करीत असताना गोंगाट केला असेल या शिक्षकांसाठी जाता जाता..

बोललो असेल
चुकून उद्दामपणाने
केल्या असतील
असंख्य चुका
आजच आहे मला मोका
मोठ्या मनाने गुरुजनानो
मला माफ करा, मला माफ करा
सारे झाले गेले सोडून द्या
पुढची लढाई लढण्यासाठी
मजला आपले आशीर्वाद द्या…

आता यापुढे सकाळी शाळेत आल्या आल्या दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताने व्हायची, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना अंगावर शहाऱ्या आणायची.

परिपाठाच्या निमित्ताने छानशी बोधकथा कानावर पडायची आणि तो बोध जीवनामध्ये अंगी करण्यासाठी आपण तत्पर राहायला हवे असे देखील वाटून जायचे.

स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाची तयारी करताना शाळेत आणि घरी दिलेला वेळ. आपले सादरीकरण चांगले व्हावे यासाठी मित्र-मैत्रिणी यांनी घेतलेली मेहनत आज सर्व काही डोळ्यासमोर एखाद्या चित्रफिती प्रमाणे उभे राहत आहे.

परीक्षेच्या वेळी वर्गामध्ये शिक्षक वर्गात असताना, आपल्या मित्र-मैत्रिणींना अगदी मार खाऊन केलेली मदत देखील मला आजही आठवत आहे.

ज्या मित्र-मैत्रिणींशी भांडलो आज त्यांचे चेहरे आज डोळ्यापुढे उभे राहत आहेत. असं वाटत आहे आज माझ्या शाळेतील जीवन प्रवासाची कॅसेट उलटी फिरत आहे. शाळेतला तो पहिला दिवस, नवे मित्र, नवी बाक सगळं काही नवनवं. परंतु ते कधी आपलेसे झाले हे कळले नाही.

आज या शाळेला माझ्या मित्र-मैत्रिणींना माझ्या प्रिय शिक्षक बंधू ,भगिनींना आणि खास करून माझ्या शाळेला निरोप देताना अंतकरण अगदी जड झाले आहे. का कुणास ठाऊक मन भरून आले आहे. मन आता पुन्हा एकदा म्हणत आहे,

शाळेतली ती मस्ती
शिक्षकांची धास्ती
बोरिंग तासाला येणारी सुस्ती
मागच्या बाकावर बसून
मित्र मैत्रिणींची केलेली
ती निंदा नालस्ती..

सर्व काही पुन्हा करावे या शाळेला पुन्हा एकदा कवेत घ्यावे.

असे वाटते आताच पळत जावे
त्या मोकळ्या मैदानात
घुमवावा आवाज त्या आसमंतात
धरूनी ठेवाव्या या शाळेतील
आठवणी कायम हृदयात.

आज या शाळेने मला केवळ परीक्षार्थी न बनवता एक माणूस म्हणून एक देशाचा नागरिक म्हणून दिलेले सर्व धडे मी माझ्या भावी जीवनामध्ये नक्कीच उपयोगात आणेन.

आकाशाचा केला कागद
केली समुद्राची शाई
तरी या शाळेची महती
लिहून होणार नाही पुरी
शाळेपासून आम्ही जातोय दुरी
पण आठवनी दाटून येतील क्षणोक्षणी 😌

अशी ही माझी शाळा आज मला पुढील शिक्षणासाठी सोडावी लागत आहे. सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे हे निरोप समारंभाचे (10th Class Send Off Speech In Marathi) लांबलेले भाषण थांबवतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र…

सारांश

खरोखरच मित्रांनो, दहावी पर्यंतचे शिक्षण आणि शाळा, मित्र मैत्रिणी, शिक्षक, परिसर हे अगदी आयुष्यभर लक्षात राहतात. या शालेय आठवणी पुन्हा पुन्हा अनुभवावा अस वाटत. पण हे क्षण आणि असा आनंद पुन्हा मिळेल हे अशक्यच असते.

कारण शाळेतील मित्र-मैत्रिणी, गुरुजी आणि शाळेतील इतर कर्मचारी यांच्यासोबत आपले एक वेगळेच नाते तयार झालेले असते. याच्यासोबत केलेले मजा मस्ती आठवली तरी मन आनंदित होते.

मी दहावी सोडून आज सात वर्ष झाले. मला आजही माझी शाळा, माझे मित्र मैत्रिणी, गुरुजी खूप आवडतात, आठवत राहतात नेहमीच..

असो, शाळेविषयी बोलायला लागलो, तर लेख अख्ये पुस्तकच बनून जाईल. आशा करतो की, इयत्ता दहावी निरोप समारंभ भाषण (10th Class Send Off Speech In Marathi) तुम्हाला नक्कीच आवडले असेल.

मित्रांनो, या भाषणाचा आधार घेत निरोप समारंभात नक्की भाषण करा, कारण भविष्यात तुम्ही कुठेही भाषण केले तरीही दहावी ती मज्जा परत नाही…