Brother Sister Bond In Marathi – रक्षाबंधन असो की भाऊबीज, हे दोन्ही सण बहीण भावाच्या नात्याला नव्याने उजाळा देतात. या सणाच्या निमित्ताने बहिण आपल्या भावाला ओवाळत त्याच्या हाताला राखी बांधते. या बदल्यात भाऊ त्या बहिणीला भेटवस्तू देऊन मी तुझे अखंड रक्षण करीन, असे कळत नकळतपणे वचन देत असतो.
पण सध्या घराघरात बहीण आणि भावाच्या नात्यातील जिव्हाळा कमी होताना दिसतो, विशेषतः विवाहानंतर. याचे विविध कारण असू शकतात, पण यातील मुख्य कारण म्हणजे पैसा, एकमेकांत न होणारा संवाद, स्वार्थीवृत्ती इत्यादी.
यासाठी आपण या लेखाच्या माध्यमातून भावा बहिणीचे नाते नेमके कसे असावे (Brother Sister Bond In Marathi) याविषयी चर्चा करणार आहोत.
भावा बहिणीचे नाते कसे असावे (Brother Sister Bond In Marathi)

प्रत्येक कुटुंबामध्ये आई-वडील, भाऊ-बहीण, आजी आजोबा असे सर्वजण अगदी गुण्यागोविंदाने राहत असतात. यातले प्रत्येक नाते अगदी छान असते, पण बहिण भावाच्या नात्याची खोली काही वेगळीच असते.
कधी कधी लहान सहान गोष्टींवरून बहिण आणि भावामध्ये कडाक्याची भांडणे होतात. पण एकमेकांशी भांडून देखील ते नेहमीच एकमेकांची काळजी घेतात.
वडिलांनी आपल्या दादावर रागावताच वडिलांना त्याच्यावरती रागावू नका….. असे सांगणारी देखील आपली बहिणच असते.
आपण प्रत्येकाने लहानपणी अनुभवले असेलच, बहीण आणि भावामध्ये कारण नसताना संघर्ष, वादविवाद होताना दिसतो. पण असे असले तरीही ते एकमेकांची काळजी दोघेही घेताना कुठेही कमी पडत नाहीत.
घरात भावाकडून चूक झाल्यानंतर वेळप्रसंगी एखादी बहीण त्याचा मार वाचावा म्हणून खोटे देखील बोलते. तसेच बहिणीची चूक स्वतःच्या अंगावर घेताना तिचा लहान असो की मोठा तो भाऊच असतो. थोडक्यात काय तर बहीण भावाच्या नात्यात एक प्रकारचा वेगळाच गोडवा आपल्याला पाहायला मिळतो.
बहिण भाऊ एकत्र असताना, लहानाचे मोठे होत असताना, हेवेदावे इरशा आपल्याला जाणवते. मात्र जसजसे त्यांचे वय वाढत जाते तसतसे या नात्यात एक समोपचाराची भावना वाढीस लागते.
बहिण आपले घर सोडून लग्नानंतर तिच्या सासरी जाणार त्यावेळी तिच्या गळ्यामध्ये पडून मोठ्याने रडणारा भाऊच असतो.
असो बहिण भावाच्या नात्यात एकमेकांविषयी आत्मीयता असणे अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या बहिणीकडून काही चुकत असेल किंवा भावाकडून काही चुकत असेल अशावेळी सरळ सरळ आरोप प्रत्यारोप न करता समोपचाराने एकमेकांशी बोलायला हवे.
बहिण सासरी गेल्यानंतर जर काही कारणाने तिच्या संसारिक जीवनामध्ये अनंत अडचणी असतील अशावेळी भावाने हात वर न करता त्या बहिणीला साथ द्यावी.
आपल्या बहिणीच्या संसाराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. जर आपली बहीण चुकत असेल तर तिला समजदेखील द्यायला हवी.
थोडक्यात बहिण भावाच्या नात्यांमध्ये एकमेकांविषयी असलेली जबाबदारीची भावना अखंड जपणे अतिशय गरजेचे आहे. कारण आई-वडिलांनंतर आपल्या रक्ताचे आणि अखंडपर्यंत सोबत असणारे नाते हे बहीण भावाचे आहे.
Related – नवरा बायकोचे नाते कसे असावे?
भावा बहिणीचे नाते कसे असावे (Brother Sister Bond In Marathi)
केवळ रक्षाबंधन आणि भाऊबीज असे सण उत्सव उत्साहात साजरे केले, फोटोशूट केले आणि स्टेटस मेंटेन केल्याने आपण आपले हे नाते चांगल्या पद्धतीने जपतोय अशा भ्रमात न राहता एकमेकांच्या संपर्कात कायम राहणे अतिशय गरजेचे आहे.
वर्षभरामध्ये वेगवेगळ्या सणसमारंभामध्ये एकत्र येणे आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगांमध्ये एकमेकांना साथ देणे हे बहिण भावाच्या नात्यांमध्ये अतिशय गरजेचे आहे.
आजकाल माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. याला बहिण भावाचे नाते देखील अपवाद नाही म्हणूनच या रक्षाबंधनाच्या निमित्ताने केवळ बहिणीचे रक्षण करण्याचे बंधन म्हणजे रक्षाबंधन ही संकल्पना प्रत्यक्षात यायला हवी.
माझ्या बहिणीवर कोणत्याही संकट आले तरी मी त्या ठिकाणी भीम म्हणून उभा राहील त्या संकटातून माझ्या बहिणीला बाहेर काढेल अशी भूमिका घेणारा भाऊ आज गरजेचा आहे.
अलीकडच्या काळात आई-वडिलांच्या नंतर संपत्तीवरून वादविवाद होताना दिसतात. कोर्टामध्ये बहीण आणि भाऊ एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप करत असतात. कुठेतरी बहीण भावाचे नाते आणि त्यातला निकोपपणा आजच्या या स्वार्थी जगामध्ये हरवत चालला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
बहीण भावाच्या नात्यांमध्ये धनसंपत्ती, पैसा अडका, स्वार्थ या बाबी न येता दोघांनीही एकमेकांना सुखात आणि दुःखात साथ देण्याचा संकल्प केला पाहिजे.
आता तर मोबाईल आल्यापासून पूर्वी घरामध्ये बहिण भाऊ यांची खेळ चालायचे खेळता खेळता मध्येच भांडणे व्हायची तर कधी कधी माझा दादा माझ्यासोबत खेळत नाही म्हणून आईसमोर रडणारी बहीण होती. पण अलीकडे मोबाईल रुपी राक्षस हातात आल्यापासून बहिण भावातील संवाद अतिशय कमी झाला आहे.
आई-वडिलांनी जाणीवपूर्वक आपल्या मुला-मुलींमध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आज महिला अतिशय असुरक्षित आहेत अशावेळी या रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरातील प्रत्येक आई-वडिलांनी ज्या पद्धतीने तू तुझ्या बहिणीची काळजी घेतो. त्याच पद्धतीने तू इतर मुलींना देखील मान सन्मानाने वागवले पाहिजे. परस्त्री भगिनी समान हे सूत्र जोपर्यंत प्रत्येक कुटुंबाच्या जगण्यामध्ये येणार नाही. तोपर्यंत या विश्वातील माता भगिनी सुखी होणार नाहीत.
यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की सगळ्यांशी चांगले वागू या चांगले राहूया प्रांजल मैत्री करूया. असे केले तर बहिण भावाच्या नात्याची व्यापकता केवळ कुटुंबापूर्ती न राहता ती विश्वमय होईल आणि एक प्रकारे कायमच असुरक्षित असणारा महिला वर्ग अगदी बिनधास्तपणे मोकळा श्वास घेईल. खरोखरच हीच खरी रक्षाबंधनाची भावाने बहिणीला दिलेली मोठी भेट असेल.
Related – माझी ताई मराठी निबंध
सारांश
तर मित्रांनो, आपण आज लहानपणी बहिण भावाचे नाते कसे असते, कालांतराने त्या नात्यांमध्ये होणारे बदल त्याचबरोबर कौटुंबिक वातावरणात अडकल्यानंतर त्या भावाला बहिणीचा पडत असलेला विसर अशा सर्वच विषयांवर आपण आज मंथन केले.
या लेखाच्या माध्यमातून बहीण भावाच्या नात्याची गोडी (Brother Sister Bond In Marathi) अधिक कशी वाढेल, यासाठी आपण काय करायला हवे याविषयी माहिती पाहिली. साहजिकच बहीण भावाचं नातं नेमकं कसा असावा तर हसरे, खेळकर, आनंददायी बिनधास्त, त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव असलेले हे नाते असावे असे मला वाटते.