नमस्कार मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी शेअर बाजार हे नाव ऐकले असेल. शेअर बाजारात पैसे कमविण्याची खूप संधी आहे. परंतु बऱ्याचदा लोक शेअर बाजारात आपले पैसे गमावून बसतात, याचे बरेसचे कारणे आहेत पण यापैकीच एक महत्वाचे कारण म्हणजे शेअर बाजारातील अपुरे ज्ञान असणे होय.
यासाठी मी आज तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून भारतातील शेअर बाजाराची ओळख करून देत आहे. आशा करतो की, या लेखातून तुम्हाला शेअर बाजाराची प्राथमिक माहिती व्यवस्थितपणे समजेल.
शेअर बाजार म्हणजे काय?
मित्रांनो, शेअर बाजार हा आर्थिक बाजाराचा एक प्रकार आहे. आर्थिक बाजारात शेअर्स आणि बॉण्ड्सची खरेदी विक्री केली जाते. या बाजारात दोन गट पडतात, पहिला रोकड बाजार, यामध्ये प्रामुख्याने कर्जरोखे संबंधित ट्रेडिंग केली जाते. पण ही ट्रेडिंग कमी कालावधीच्या कर्ज निधीमध्ये केली जाते.
आणि दुसरा गट म्हणजे शेअर बाजार, यामध्ये प्रामुख्याने शेअर्स आणि कर्जरोखे या दोघांचे ट्रेडिंग केले जाते. यामध्ये जास्त कालावधीच्या कर्ज निधीमध्ये ट्रेडिंग केली जाते. या बाजाराचे देखील दोन प्रमुख प्रकार पडतात.
1. प्रायमरी मार्केट – या बाजारात कंपनी स्वतःच्या शेअरमध्ये लोकांनी गुंतवणूक करावी म्हणून, IPO ऑफर करते. थोडक्यात, या बाजारात कंपनी प्रत्यक्षपणे सहभाग घेते. IPO च्या मदतीने कंपनीचे मालक कंपनीचा विस्तार करण्यासाठी लोकांकडून पैसे जमवितात आणि या बदल्यात लोकांना त्या कंपनीचे शेअर दिले जातात.
2. सेकंडरी मार्केट – या बाजारात लोक आपापसात शेअर्स खरेदी विक्री करतात. थोडक्यात, या बाजारात कंपनी प्रत्यक्षपणे सहभाग घेत नाही. तर गुंतवणूकदार स्वतः लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग करत असतो.
भारतीय स्टॉक एक्सचेंज माहिती
प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजची गरज असते. भारतात बरेच प्रादेशिक स्टॉक एक्सचेंज आहेत, पण सर्वात जास्त ट्रेडिंग केले जाणारे NSE आणि BSE हे दोन एक्सचेंज आहेत.
NSE चा फुल फॉर्म National Stock Exchange असा आहे. यामध्ये एप्रिल 1994 साली होलसेल कर्जरोखे ट्रेडिंग सुरू झाली आणि जून 1994 मध्ये शेअर्स ची ट्रेडिंग सुरू झाली.
BSE चा फुल फॉर्म Bombay Stock Exchange असा आहे. हे आशिया खंडातील सर्वात जुने आणि भारतातील पहिले सरकारमान्य एक्सचेंज आहे.
NSE आणि BSE मध्ये लिस्ट झालेल्या प्रमुख कंपनीच्या आधारे इंडेक्सची रचना केली जाते. BSE वर आधारित असलेल्या इंडेक्सला सेन्सेक्स म्हंटले जाते. यात प्रामुख्याने 30 कंपन्यांचा समावेश केला जातो. NSE वर आधारित असलेल्या इंडेक्सला निफ्टी असे म्हणतात. यात प्रामुख्याने 50 कंपन्यांचा समावेश आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया
सेबीची स्थापना 12 एप्रिल 1992 रोजी झाली होती. ही संस्था केंद्रीय सरकारच्या नियंत्रणाखाली काम करते. या संस्थेचे कार्य पुढीलप्रमाणे आहेत.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची मूलभूत जबाबदारी गुंतवणूकदाराच्या हितांचे रक्षण करणे होय. शेअर बाजारात कायदा आणि नियमांचे काटेकोर पालन होत आहे का नाही हे सेबी पाहते.
ऑप्शन आणि फ्युचर बाजाराचे नियमन तसेच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट साठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्याचे काम सेबीचे आहे. शेअर बाजार आणि इतर बाजारसोबत जोडले गेलेल्या मध्यस्थ लोकांचे मार्गदर्शन सेबी करते.
शेअर ट्रान्सफर एजंट आणि रजिस्टर यांना मार्गदर्शन सेबीचे करते. आयपीओ, म्युचल फंड आणि कर्जरोखे यासाठी योग्य सूचना काढणे. इन्सायडर ट्रेडिंगसाठी माहिती पुरविणे. कंपनीत टेकओवर करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे.
गुंतवणुकदाराने केलेली तक्रार आणि त्याची काही फसवणूक होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्याचे काम सेबी करते.
शेअर बाजारात कमाई करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय
मित्रांनो, शेअर बाजारात कमाई करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने गुंतवणूक, इंट्राडे आणि डेरिव्हेटिव्ह पोझिशन, अर्बीट्रेज, मार्जिन फंडींग आणि डिव्हिडंटची आवक यांचा समावेश होतो. याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊ.
1. गुंतवणूक – मित्रांनो, गुंतवणूक ही जास्त किंवा अल्प काळासाठी केली जाते. यासाठी शेअर्स विकत घेऊन ठराविक कालावधी पर्यंत डिमॅट खात्यात जमा केले जातात, आणि चांगला फायदा मिळत असेल तर विक्री केली जाते. हा शेअर बाजारातील सर्वात चांगला कमाईचा मार्ग ठरू शकतो.
2. इंट्राडे आणि डेरिव्हेटिव्ह पोझिशन – या प्रकारात शेअर्सची डिलिवरी न घेता ट्रेडिंग करून बाजारात चढ उतार असला तरीही नफा मिळवता येतो. सोबतच ऑप्शन आणि फ्युचर सारख्या डेरिव्हेटिव्ह पोझिशन घेऊन अधिकचा नफा मिळविता येतो.
3. अर्बीट्रेज – या प्रकारात दोन स्टॉक एक्सचेंज मधील फरकाचा फायदा घेऊन, पैसे कमविता येतात. उदा. NSE मध्ये abc शेअर 10 रुपयांना असेल, आणि BSE मध्ये 11 रुपयांना असला तर अश्या वेळी अर्बीट्रेज पद्धतीने तुम्ही 1000 abc शेअर 10 रुपयांना घेऊन, 11 रुपये याप्रमाणे विकले असता, 1000 रुपयांचा नफा मिळवता येईल.
4. मार्जिन फंडींग – या प्रकारात तुम्ही तुमच्या खात्यातील असलेल्या शेअर्सवर तुम्हाला जास्तीचे मार्जिन मिळते, याच्या मदतीने जास्त डिलिवरी घेऊन काम करता येते.
5. डिव्हिडंड – हा काही पैसे कमविण्याची मुख्य स्रोत नसून, हा डिव्हिडंडच्या दृष्टीने मिळालेला नफा म्हणता येईल. डिव्हिडंड मिळविण्यासाठी शेअर्स ची डिलिवरी घ्यावी लागते. बाजारातील कंपनी त्यांच्या वार्षिक धोरणानुसार गुंतवणुकदारास बोनसच्या रुपात डिव्हिडंड दिला जातो.
शेअर्स ची डिलिवरी घेतल्यानंतर, हे शेअर्स तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये जमा केले जातात. डिमॅट खाते सर्वच सरकारी आणि खासगी बँकेत तसेच शेअर दलालाकडे उघडता येते.
सारांश
मित्रांनो, आशा करतो की, तुम्हाला भारतातील शेअर बाजाराची ओळख बऱ्यापैकी झाली असेल. जर तुम्हाला यामध्ये काही शंका असल्यास, ईमेल करून विचारू शकता.