Trade Bill And Accommodation Bill – मित्रांनो, हुंडी हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल, यालाच इंग्रजीमध्ये Bill असे म्हणतात. आपण दैनंदिन जीवनात अनेक व्यवहार उधारीवर करत असतो, तसेच मोठमोठ्या उद्योग-धंद्यात देखील मोठ्या संख्येने उधारीवर व्यवहार होत असतात.
पण औद्योगिक जगतामध्ये व्यवहारांची रक्कम मोठी असल्यामुळे, या उधारीची लेखी नोंद केली जाते. यातूनच पतपत्र, वचनपत्र आणि धनादेशाची सुरुवात झाली. पुढे उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये हुंड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येते.
त्यामुळे आधुनिक व्यापारात हुंडीला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. या लेखातून आपण हुंडी म्हणजे काय, त्याचे वैशिष्टे, प्रकार, फायदे (Trade Bill And Accommodation Bill) सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
संबंधित लेख – रोख पुस्तक आणि पासबुकाप्रमाणे दर्शविल्या जाणाऱ्या शिलकांमध्ये फरक पडण्याची कारणे
Table of Contents
- हुंडी म्हणजे काय (Trade Bill Meaning With Example In Marathi)
- हुंड्यांचे प्रकार किती व कोणते आहेत (Types Of Bill In Marathi)
- हुंड्यांचे फायदे काय आहेत (Benefits Of Bill In Marathi)
- व्यापारी हुंडी आणि सोय हुंडी यांच्यातील फरक (Difference Between Trade Bill And Accommodation Bill)
- सारांश
हुंडी म्हणजे काय (Trade Bill Meaning With Example In Marathi)

एखाद्या विशिष्ट व्यक्तीस किंवा तिच्या आदेशानुसार दुसऱ्या व्यक्तीस किंवा वाहकांस विशिष्ट रक्कम विनाअट देण्याची वचनदात्याने आपली स्वाक्षरी करून एखाद्या व्यक्तीस दिलेली लेखी आज्ञा म्हणजे हुंडी होय.
हुंड्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ?
1. हुंडी लेखी असली पाहिजे.
2. हुंडीमध्ये फक्त पैसे देण्याबद्दल आज्ञा असली पाहिजे.
3. पैसे देण्याची आज्ञा विनाअट असावी.
4. हुंडीवर आदेशकाची स्वाक्षरी असावी.
5. हुंडीमध्ये देय रक्कम निश्चित असली पाहिजे.
6. हुंडीमध्ये रकमेचा प्राप्तकर्ता निश्चित असली पाहिजे.
7. रक्कम देणारी व्यक्ती निश्चित असली पाहिजे.
8. देय रकमेनुसार योग्य त्या मुद्रंकावर हुंडी लिहिलेली असावी.
9. हुंडीमध्ये एकापेक्षा जास्त आज्ञार्थी असू शकतात.
10. हुंडीवर ती काढल्याचा दिनांक असला पाहिजे.
सामान्यतः हुंडीला तीन पक्ष असतात.
आदेशक, आहर्ता, हुंडी काढणारा, धनको किंवा विक्रेता | स्वतःचे पैसे वसूल करण्यासाठी हुंडी काढणारा सावकार |
आदेशिती, आज्ञार्थी, स्वीकर्ता, हुंडी स्वीकारणारा, ऋणको किंवा खरेदीदार | ज्या व्यक्तीवर हुंडी काढली आहे तो देणेदार |
आदाता, प्राप्तकर्ता | ज्याच्या नावाने हुंडी लिहिण्यात येते तो घेणेदार |
संबंधित लेख – संयंत्र, व्यवसाय संस्था व उद्योग म्हणजे काय ?
हुंड्यांचे प्रकार किती व कोणते आहेत (Types Of Bill In Marathi)
काळ, स्थळ आणि व्यवहार यांनुसार हुंड्यांचे खालील प्रकार पडतात.
§ काळानुसार – हुंडीचे काळानुसार दोन प्रकार पडतात.
1. दर्शनी हुंडी – ज्या हुंडीचे पैसे मागणी करताच किंवा सादर करतानाच द्यावे लागतात, त्या हुंडीला दर्शनी हुंडी असे म्हणतात.
2. मुदती हुंडी – ज्या हुंडीचे पैसे त्यामध्ये नमूद केलेल्या मुदतीनंतर द्यायचे असतात, त्या हुंडीला मुदती हुंडी असे म्हणतात.
§ स्थळानुसार – हुंडीचे पैसे देण्याच्या ठिकाणावरून तिचे दोन प्रकार पडतात.
1. देशी हुंडी – जेव्हा हुंडी काढणारा आणि हुंडी स्वीकारणारा हे दोघेही एकाच देशात राहणारे असतात, तेव्हा त्या हुंडीला देशी हुंडी असे म्हणतात.
2. विदेशी हुंडी – जेव्हा हुंडी काढणारा एका देशात राहतो आणि हुंडी स्वीकारणारा दुसऱ्या देशात राहतो, तेव्हा त्या हुंडीला विदेशी हुंडी असे म्हणतात.
§ व्यवहारानुसार – व्यवहाराच्या स्वरूपावरून तिचे खालील दोन प्रकार पडतात.
1. व्यापारी हुंडी – व्यापारी देण्या-घेण्यातून उद्भवलेल्या परिणामांतून धनकोने ऋणकोवर काढलेल्या हुंडीला व्यापारी हुंडी असे म्हणतात.
2. सोय हुंडी – जेव्हा हुंडी काढणाऱ्याचा हुंडी स्वीकारणारा कसलेही देणे लागत नाही, तर त्याला केवळ आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने ही हुंडी स्वीकारतो त्याला सोय हुंडी असे म्हणतात.
संबंधित लेख – बँक जुळवणीपत्रक तयार करण्याचे महत्त्व आणि आवश्यकता
हुंड्यांचे फायदे काय आहेत (Benefits Of Bill In Marathi)
हुंड्यांच्या व्यवहारातून अनेक फायदे होतात, ते पुढीलप्रमाणे सांगता येतील.
1. हुंडीची स्वीकृती म्हणजेच आदेशकाच्या कर्जाला आदेशितीने दिलेली लेखी कबुली असते. त्यामुळे धनकोचे कर्ज बुडण्याची किंवा नाकबूल केले जाण्याची भीती नाहीशी होते.
2. आदेशितीने हुंडीचे अनादरण केल्यास आदेशक नवीन हुंडी काढून जुन्या हुंडीचे पैसे वसूल करू शकतो.
3. हुंडीच्या अनादरणामुळे पैसे वसूल होऊ शकले नाहीत, तर हुंडी लेखी पुराव्याआधारे ऋणको विरुद्ध कोर्टामध्ये वसुलीसाठी दावा करू शकतो.
4. मुदतीच्या हुंडीमुळे देण्या-घेण्याची निश्चितता प्रस्थापित होते.
5. आदेशकाला पैशाची गरज असल्यास बँकेकडे हुंडी वटवून पैसे उपलब्ध करता येतात.
6. हुंडीचा आदेशक त्याच्या धनकोचे पैसे देण्याकरता त्या हुंडीचे पृष्ठांकन करून आपल्या कर्जाची परतफेड करू शकतो.
7. विदेशी व्यापारामध्ये कर्जाची परतफेड करण्यासाठी हुंडी हा अत्यंत सोयीस्कर, सहजसुलभ, पूर्ण सुरक्षित आणि कमीत कमी खर्चाचा असा सर्वोत्तम मार्ग आहे.
8. हुंड्यांमुळे आदेशकाला आपल्या ऋणकोकडून येणारी रक्कम किती व केव्हा मिळणार हे निश्चित करू शकते.
9. व्यापारी एकमेकांच्या आर्थिक अडचणी सोय हुंड्या काढून दूर करू शकतात.
संबंधित लेख – सहकारी संस्थेचे फायदे आणि तोटे काय आहेत ?
व्यापारी हुंडी आणि सोय हुंडी यांच्यातील फरक (Difference Between Trade Bill And Accommodation Bill)
व्यापारी देण्याघेण्याच्या परिणामातून धनकोने ऋणकोवर काढलेल्या हुंडीला व्यापारी हुंडी असे म्हणतात.
याउलट ऋणांचे अस्तित्व नसताना केवळ एकमेकांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने काढलेली आणि स्वीकारलेली हुंडी म्हणजे सोय हुंडी होय.
व्यापारी हुंडी पूर्णपणे कायदेशीर असतात, तर सोय हुंडी पूर्णपणे बेकायदेशीर असतात. या हुंड्यांच्या दोन पक्षामध्ये धनको ऋणकोचे नाते असते.
सोय हुंडी स्वीकारणाऱ्याला कसलाही मोबदला मिळालेला नसतो. केवळ हुंडी काढणाऱ्यावर अनुग्रह करण्यासाठी किंवा त्याला आर्थिक सहाय्य करण्याकरता तो हुंडी स्वीकारतो. यामध्ये आदेशक आणि स्वीकर्ता हे परस्परांना जबाबदार नसतात.
त्यामुळेच आदेशकाने हुंडीची पूर्ण रक्कम किंवा त्याच्या वाट्याची रक्कम स्वीकर्त्याकडे पाठविल्याशिवाय स्वीकर्ता त्या हुंडीचे प्रदानीकरण करणार नाही.
सोय हुंडीसंबंधीच्या व्यवहार नोंदी रोजकिर्दीमध्ये करताना व व्यापारी हुंडीच्या नोंदी करताना विचारात घ्यायचे सर्व नियम त्याच पद्धतीने वापरले जातात.
व्यापारी हुंडी | सोय हुंडी |
---|---|
व्यवहारांना वित्तपुरवठा करण्यासाठी वापरला जातो. | आर्थिक सहाय्य करण्यासाठी वापरले जातो. |
यामध्ये तीन पक्ष असतात, विक्रेता, खरेदीदार आणि ग्राहक | यामध्ये दोन पक्ष असतात, हुंडी बनवणारा आणि हुंडी स्वीकारणारा |
प्राथमिक दायित्व आदेशितीकडे असतो. | प्राथमिक दायित्व आदेशकावर असतो. |
देय तारीख निश्चित असते. | विनंतीनुसार देय तारीख बदलू शकते. |
ही हुंडी कायदेशीर असते. | ही हुंडी बेकायदेशीर असते. |
सारांश
मी आशा करतो की, या लेखातून हुंडी म्हणजे काय, त्याचे वैशिष्टे, प्रकार, फायदे ( Trade Bill And Accommodation Bill) सविस्तरपणे समजले असतील. जर तुम्हाला या लेखाविषयी काही समस्या असल्यास आम्हाला नक्कीच कळवा.